रत्नागिरी : भोके (ता. रत्नागिरी) येथील पोस्ट कार्यालयातील डाकपालाने लाखो रुपयांचा अपहार करूनही ग्रामस्थांच्या तक्रारीची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आमचे पैसे परत द्या, तसेच या डाकपालाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करीत आज (शुक्रवारी) भोके ग्रामस्थांबरोबरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मुख्य पोस्ट कार्यालयाला दणका देत दौऱ्यावर आलेले विभागीय डाकपाल विनोदकुमार वर्मा यांना घेराव घातला.भोकेच्या पोस्टात डाकपाल विनायक साळवी यांनी अपहार केल्याचे काही दिवसांपूर्वीच सिध्द झाले आहे. या गावातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांनी भोके पोस्ट कार्यालयात बचत खाते, मासिक बचत, विमा व मुदत ठेव यांसारखी विविध खात्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, भोके डाकपाल साळवी यांनी अनेक खातेदारांच्या खोट्या सह्या, अंगठे घेऊन लाखो रुपयांचा अपहार केला आहे. अनेक खातेदारांचे पैसे मुख्य कार्यालयात भरलेच नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. याबाबत जानेवारी महिन्यात ग्रामस्थांनी डाक अधीक्षक जी. एस. राणे यांना घेराओ घातला. यानंतर डाक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन फसवणूक झालेल्या ग्रामस्थांची यादी निश्चित केली. परंतु, या यादीतून अनेक ग्राहकांची नावे गायब असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यादीत नाव नसलेल्या ग्रामस्थांनी संतप्त होत शुक्रवारी रत्नागिरीच्या मुख्य डाक कार्यालयावर धडक मारली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय सालीम, पंचायत समिती उपसभापती पाटील, संजय पुनसकर उपस्थित होते. सुमारे ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार होऊनही अधिकाऱ्यांनी केवळ ३३ लाखांचा अपहार झाल्याचे दाखवले आहे. यामुळे या यादीचे फेर सर्वेक्षण करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर विभागीय डाकपाल विनोदकुमार वर्मा यांनी काही दिवसांत अधिकाऱ्यांना गावात पाठवून फसवणूक झालेल्या ग्रामस्थांची नावे यादीत नव्याने समाविष्ट करून घेण्यात येतील, एकही ग्रामस्थ भरपाईपासून वंचित राहणार नाही. ज्यांच्याकडे पैसे गुंतवल्याचा पुरावा आहे, त्यांना भरपाई देण्यात येईल. ज्यांची नावे नाहीत, त्यांना भरपाई देण्यासाठी शाखा व्यवस्थापकांकडून नव्याने चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन या ग्रामस्थांना दिले. ३३ लाखांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी सिध्द झाले आहे. यापैकी १५ लाखांचे वाटप हाती घेण्यात येणार असून, उर्वरित १८ लाखांचे वाटप लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या अपहाराची चौकशी करण्यासाठी आठजणांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
भोकेत विभागीय डाकपालांना घेराव
By admin | Updated: July 9, 2016 00:55 IST