रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई व उपविभागातून १,२०० जादा गाड्या जिल्ह्यात आल्या होत्या. मात्र परतीच्या प्रवासासाठी एस.टी. ला मागणी वाढली आहे. आतापर्यंत १,००९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६७ ग्रुप बुकिंग गाड्यांचा समावेश आहे.
मुंबर्ई, ठाणे, पालघर येथून कोकणात १,२०० जादा गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीसाठी जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑनलाईन आरक्षण असलेल्या ७४२, ग्रुप बुकिंगच्या २६७ गाड्यांचा समावेश आहे. यावर्षी गौरी गणपतीचा सण चार दिवस साजरा करण्यात आला. पाचव्या दिवशी गौरीसह गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवसापासून मुंबईकर परतीच्या मार्गाला लागणार असल्याने दि. १४ पासून २१ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड आगारातून ८२, दापोली १४३, खेड १०३, चिपळूण १७८, गुहागर १३१, देवरूख १२९, रत्नागिरी ९९, लांजा ८४, राजापूर ५९ मिळून एकूण १,००९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून आणखी गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
...................
गतवर्षी १,२०० जादा गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी मुळातच गणेशोत्सवासाठी आलेल्या एस. टी.ची संख्या अधिक आहे. त्यामुळे परतीच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जात आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत जादा गाड्यांना मागणी असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी