राजापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात राजापूर तालुक्यात कोरोनाचा फैलाव सर्वत्र होताना दिसत असून तालुक्याच्या विविध भागांतून रुग्ण निष्पन्न झाले आहेत. नव्या सात रुग्णांमुळे तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १८ जणांचे स्राव निगेटिव्ह आले आहेत.
नव्याने आढळून आलेल्या सात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोनिवडे कातळवाडी येथील एक, उन्हाळे कणेरीवाडी येथील एक, हर्डी येथील दोन, कारवली येथील एक, कशेळीच्या बावकरवाडीतील एक व जैतापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे राजापुरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४१८ झाली असून, यातील ३७४ रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत; तर १८ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू ओढवला असून, सध्या २६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.