रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीने करण्यात आली. यात लक्षणे नसलेले रुग्ण आढळले. आरोग्य विभागाच्या अहवालावरून सापडलेल्या रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. मात्र अशा अलक्षणे असलेल्यांकडून संसर्गाचा धोका वाढतो आहे. सध्या सक्रिय असलेल्या १५८७ रुग्णांपैकी १२४१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.
कोरोनाची पहिली लाट जिल्ह्यात मार्च २०२० पासून सुरू झाली. सुमारे महिना-दोन महिने रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, त्यानंतर मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्ण वाढले. ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांत ही संख्या लक्षणीय वाढली. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत घट झाली.
डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या घटलेली होती. मात्र, त्यानंतर लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाले. त्यामुळे जवळपास सात-आठ महिने घरात राहिलेले नागरिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून हळूहळू रुग्णसंख्या वाढली. मार्चमध्ये कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी आले. त्यामुळे पुन्हा रुग्णसंख्या भरमसाट वाढली आहे. गेल्या चार-साडेचार महिन्यांतच केवळ ६२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. त्याआधीच्या वर्षभरात ही संख्या साडेदहा हजारांपर्यंत होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडू लागल्या. रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे अशांना घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, या घरात राहिलेल्यांमुळेच पुन्हा घरातील अन्य सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसाला अगदी ७०० ते ८०० पर्यंत जाऊ लागली. लक्षणे दिसत असली तरीही भीतीने उपचारासाठी दाखल न होणाऱ्यांची संख्याही वाढली. परिणामी मृत्यूचे प्रमाणही वाढले.
गृह विलगीकरणात असलेल्यांपासून संसर्ग वाढतोय, हे लक्षात येताच पुन्हा गृह विलगीकरणावर शासनाने बंदी आणली. त्याचबरोबर कोरोनाच्या चाचण्या अधिकाधिक वाढविण्याचा निर्णय घेतला. विविध कार्यालयांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी, व्यापाऱ्यांसाठी लसीकरण किंवा चाचण्या सक्तीचे केल्याने यामुळे रुग्णसंख्या वाढली. चाचण्यांमुळे अलक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही दिसू लागली.
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. मात्र, अजूनही कमी लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी खासगी रुग्णालयात जात आहेत. त्यामुळे अन्य लोकांमध्ये संसर्ग होण्याचा धोका कायम आहे.
कोटसाठी
दुसऱ्या लाटेत लक्षणे नसलेल्या किंवा साैम्य लक्षणे असलेल्या लोकांकडून ज्येष्ठ नागरिक तसेच मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाधितांपैकी ८० टक्के लोक लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आता नागरिकांनीही सहकार्य करायला हवे. लक्षणे दिसताच तातडीने चाचणी करून घेतल्यास लगेचच उपचार सुरू होतील. त्या व्यक्तीपासून होणारा संसर्गही थांबेल.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण : ७३,८४३, ॲक्टिव्ह रुग्ण १५८७
बरे झालेले रुग्ण ६९,८९१, लक्षणे नसलेले १२४१
मृत्यू : २१८६, लक्षणे असलेले : ३४६
आतापर्यंत चाचणीसाठी पाठविलेले अहवाल : ६,६२,१८६
निगेटिव्ह अहवाल ५,८८,३३१
इतर अहवाल १२