खेड : डॉन दाऊद इब्राहीम कासकर याचे मुंबके येथील राहाते घर सरकारजमा झाले असले तरीही हे घर गावातीलच ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी तसे पत्रच ग्रामपंचायतीला दिले असून, या पत्रावर सविस्तर चर्चा करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच अकबर दुदुके यांनी माहिती दिली. यामुळे अंडरवर्ल्ड दाऊद कासकर याच्या घराचा लिलाव करण्याच्या वावड्या निष्प्रभ ठरल्या आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊद कासकर याच्या मालकीच्या बहुतांश सर्वच मालमत्तांवर सरकारने टाच आणली आहे. विविध गुन्ह्यात दाऊदचा हात असल्याच्या संशयावरून खेड तालुक्यातील मुंबके येथील दाऊदचे राहाते घरदेखील ३५ वर्षांपूर्वी सरकारने सील केले आहे. सरकारच्या या कार्यवाहीनंतर हे घर आता स्मशानशेड झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या घरामध्ये कोणीही राहात नसल्यामुळे या घराभोवती झाडी वाढली आहे. पडक्या भिंती, तुटके दरवाजे आणि खिडक्या अशा अवस्थेत इमारतीची पडझड झाली आहे. दोन मजली इमारत असून, या इमारतीमध्ये काही तरूण दारू पिण्यासाठी तसेच जुुगार खेळण्यासाठी येत असल्याची पोलिसांची माहिती आहे. अलिकडेच काही महिन्यांपासून अनोळखी तसेच संशयास्पद व्यक्तींचा वावर या घरात होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनीही दाऊदच्या या घराकडे दिवसा व रात्रीच्या सुमारास गस्त सुरू केली आहे. एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह बीट अंमलदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अशी टीम या घराकडे सतत गस्त ठेवत आहे. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून, पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत. गावातील कोणीही तरूण या इमारतीकडे फिरकणार नाही, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना ग्रामस्थांनाही दिल्या आहेत. पोलीसपाटील सदानंद महादेव सालेकर यांनीही याबाबत सूचना दिल्या असून, अनोळखी व्यक्तिंचा वावर आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे फर्मावले असल्याची माहिती दिली आहे. याच पडक्या घरात दाऊदची बहीण राहात होती, अशी माहिती उघड झाली आहे. हे घर सरकारच्या ताब्यात जाण्याअगोदर काही वर्षे या इमरतीमध्ये दाऊदची लहान बहीण राहात असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. गावातीलच जगबुडी नदीमध्ये गेली असता दाऊदच्या या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे दाऊदच्या या घरात कोणीही राहात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या बहिणीचे अशा प्रकारे निधन झाल्यानंतर कोणीही नातेवाईकांनी या घरात न राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वर्षांमध्येच दाऊदची मोठी बहीण हसिना परकार हिचे २०१४मध्ये हदयविकाराने निधन झाले. त्यामुळे दाऊदच्या या घरात गेल्या १२ वर्षांमध्ये कोणाचेही हितसंबंध राहिलेले नाहीत. मुंबके येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पोलिसांकडून याबाबतचे पत्र रवाना झाले आहे. या पत्रामध्ये दाऊदच्या या घराचा ताबा घेण्याबाबत सूचवण्यात आल्याची माहिती सरपंच अकबर दुदुके यांनी दिली. पोलिसांनी ही इमारत ग्रामपंचायतीने किंवा ग्रामस्थांनी सामाजिक कार्यासाठी वापरण्यास घेण्याबाबत सुचविले आहे. यावर सध्या मुंबकेतहल ग्रामस्थांचा विचार सुरू आहे. मुंबके येथील अंगणवाडी, तलाठी कार्यालय आणि इतर सामाजिक कार्यासाठी या इमारतीचा वापर होऊ शकतो. मात्र, पोलिसांनी किंवा सरकारने ही इमारत कागदोपत्री ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली तरच ती स्वीकारण्याबाबत गावपातळीवर विचार होऊ शकतो, अशी पुष्टीही सरपंच दुदुके यांनी दिली आहे. (प्रतिनिधी) उद्या विशेष ग्रामसभा : इमारतीचे भविष्य ठरणार घराची ही इमारत ग्रामपंचायतीने स्वीकारून तिचा वापर सामाजिक कार्यासाठी करावा, असे पत्र ग्रामपंचायतीला पाठवण्यात आले आहे. याचा विचार करण्यासाठी मुंबके ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा २५ रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेतील निर्णयावरच इमारतीचे भविष्य अवलंबून राहणार आहे. पडीक घर मुंबकेतील हे घर सध्या पडीक आहे. गेली अनेक वर्षे हे घर तसेच पडून आहे. या घराकडे फारसा कुणाचा वावरही नव्हता. मात्र, काही दिवसांपासून या घरात संशयास्पद व्यक्तींचा वावर सुरु झाला आहे. या व्यक्ती अनोळखी असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे. या घराकडे कुणीही फिरकू नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या आहेत.
कुख्यात डॉनचे घर ग्रामपंचायतीकडे ?
By admin | Updated: February 23, 2016 23:58 IST