राजापूर : एप्रिलपासून सुरु असलेल्या कडक लॉकडाऊनचा जोरदार फटका राजापूर आगारातील व्यावसायिकांना बसला आहे. या परिस्थितीत त्यांना दिलासा देण्याऐवजी एस. टी. महामंडळाने मे व जून महिन्यातील परवाना शुल्क व्याजासहीत भरण्याची नोटीस संबंधित स्टॉलधारकांना बजावून आणखीनच दणका दिला आहे.
राजापूर एस. टी. आगारात काही छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत. लाॅकडाऊनमुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून आगारातील सर्व छाेट्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. दैनंदिन प्रवासीच नसल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. उपजीविका कशी करायची, खर्च कसा भागवायचा, कामगारांचे पगार कसे द्यायचे, अशा विवंचनेत असलेल्या व्यावसायिकांना एस. टी. महामंडळाने नाेटीस पाठवून दणका दिला आहे. मे आणि जून या दोन महिन्यांचे थकीत परवाना शुल्क तत्काळ भरा, अशा स्वरूपाची नोटीस आगारातील स्टॉलधारकांना बजावण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या या परवाना शुल्कामध्ये जीएसटीसह व्याजही आकारण्यात आले आहे. सुमारे पंधरा हजारांपर्यंत एकत्रित रक्कम तत्काळ भरण्याची सूचना करण्यात आली आहे.