कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, बेडस्, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता याबाबत नियोजन सुरू आहे. सद्य:स्थितीत शासकीय रुग्णालये फुल्ल असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने उपाययोजनांबाबत सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. वास्तविक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती गंभीर झाली आहे. आणीबाणीच्या काळात विविध राजकीय पक्षांची वरिष्ठ मंडळी एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. यामुळे मनोरंजन न होता, जनमानसात एक प्रकारची चीड निर्माण होण्याची शक्यता आहे. काळ कठीण आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यापेक्षा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनतेच्या हितार्थ कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सत्ता कोणाची असो, ही वेळ एकमेकांवर आगपाखड करायची नाही, तर जनतेच्या आरोग्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही जिल्ह्यात वाढू लागले आहे. अशावेळी जनतेचे मनोबळ वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्सअभावी अन्य जिल्ह्यात रुग्णांना जावे लागते. अशावेळी पैशाचा चुराडा तर होतोच, शिवाय तेथेही सद्य:स्थितीत बेडस् उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने आता वसतिगृह, हॉटेल्स् ताब्यात घेण्याचा निर्णय सुरू आहे. सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी ठेवण्याचे प्रयोजन आहे. आरोग्य यंत्रणेपुढेही मनुष्यबळाचे आव्हान उभे ठाकले असल्याने प्रशासनाने खासगी डॉक्टर्सची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. एकूण कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण काळात तरी जनतेच्या हितार्थ विविध राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकत्र येऊन हातात हात घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात किल्मिष निर्माण करण्याऐवजी सहानुभूती, आदर निर्माण होईल अशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे.
शहराबरोबर गावपातळीवरही कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावोगावी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसंकलन करणे गरजेचे आहे. कोरोनारुरूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांना औषधोपचार वेळेवर उपलब्ध होतो, यावर कटाक्ष असणे आवश्यक आहे. जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडून येत असतात, तेव्हा विश्वासाने त्यांना निवडून दिले जाते. त्यामुळे आता पक्ष व पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी तत्त्वे बाजूला सारून जर कोविड रुग्णांना पाठबळ देऊ केले, तर ते लवकर बरे होऊ शकतात.
मेहरून नाकाडे