दापोली : कोणताही अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही. स्थगित करण्यात आलेला अभ्यासक्रम तज्ज्ञ प्राध्यापक रुजू झाल्यानंतर पूर्ववत सुरु केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी कार्यकारी परिषदेच्या सभेवेळी सांगितले.
कोकण कृषी विद्यापीठामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक नसल्याने वनस्पतिशास्र पीएचडी स्थगित करण्यात आली आहे. यामुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यापीठात कमी कर्मचारीसंख्या असल्याने आणि अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले. काही वर्षांपूर्वी दापोली येथील विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा महाबळेश्वरजवळ अपघात होऊन ३० जणांचा मृत्यू झाला. मात्र मृत व्यक्तींच्या काही नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे. मात्र अजून काही जणांना नोकरी मिळालेली नाही. तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नोकरीत घेतलेले नाही. भविष्यात नोकरभरती करताना या लोकांना विद्यापीठात नोकरीत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
नोकरभरती व येथील समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या वेळी आमदार शेखर निकम यांनी सांगितले.