दापोली : रँग्लर परांजपे यांच्या दूरदृष्टीतून स्वातंत्र्यपूर्व काळात ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या दापोली तालुक्यातील मुर्डी येथील शाळेला नवीन रूप प्राप्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात या शाळेचे फार मोठे नुकसान झाले होते. २० डिसेंबर १९३८ रोजी रँग्लर परांजपे यांनी येथे गोपाळकृष्ण गोखले या नावाने शाळा सुरू केली आता ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. या शाळेला ८३ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात रँग्लर परांजपे यांनी सक्तीने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाचे धडे दिले. यामुळे या शाळेला ऐतिहासिक महत्त्व आहे.
सह्याद्री फाऊंडेशनच्यावतीने ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा उभी राहात आहे. शिवाय रँग्लर परांजपे व मुर्डी शाळेची ओळख असलेली ही शाळा व वाचनालय इमारत नव्या रुपात पुन्हा शैक्षणिक योगदान देण्यास सज्ज होत आहे, याचा आपल्याला अभिमान असल्याचे वाचनालयाचे सचिव शशिकांत पेंडसे यांनी बोलताना सांगितले.