शिवाजी गोरे ल्ल दापोलीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केवळ १७०० मतांनी मात करून शिवसेनेच्या अनंत गीते यांना निसटता विजय मिळाला. या छोट्याशा मताधिक्यामुळे शिवसेनेचा भ्रमनिरास झाला आहे. दापोली - खेड - मंडणगड या तालुक्यांतून ५० हजारांचे मताधिक्य देण्याचे वचन आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिले होते. मात्र, दापोली विधानसभा मतदार संघातून केवळ १७,५८७ मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे तगडे आव्हान उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सूर्यकांत दळवी यांना रामदास कदम यांनी निवडणुकीपूर्वीच इशारा दिल्याने दळवी यांना विरोधकांप्रमाणे स्वपक्षातील नेत्यांशीही दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दळवी यांना कठीण जाण्याची चिन्ह आहेत.गेली २५ वर्षे येथे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. पण, अलिकडे या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत वाढलेली ताकद पाहून काँग्रेस पक्षाच्या वाट्याला असलेली दापोली विधानसभेची जागा राष्ट्रवादी आपल्याकडे घेऊ पाहात आहे. या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. गेली २५ वर्षे या मतदारसंघात काँग्रेसला अपयश येऊ लागल्याने तो राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. दळवींना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून संजय कदम आक्रमकपणे उतरण्याची शक्यता आहे.दापोली मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकरिता सोडल्यास राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे समर्थक म्हणून किशोर देसाई ओळखले जातात. त्यामुळे देसाई यांना तिकीट मिळू शकते. परंतु खेडमध्ये शिवसेनेला खिंडार पाडत स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार निवडून आणण्यात कदम यांना यश आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय कदम यांचे कौतुक केले होते. उपमुख्यमंत्र्यांची खेडमध्ये सभा घेऊन संजय कदम यांनी आधीच शक्तिप्रदर्शन केल्याने राष्ट्रवादीत तिकीट कोणाला, यावरून पेच निर्माण होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने ही जागा आपल्याकडे ठेऊन कामगार नेते भाई जगताप यांना उमेदवारी दिल्यास ही निवडणूक शिवसेनेनला कठीण जाईल. दळवी यांचा हा ‘सेफ’ मतदारसंघ यावेळी काहीसा धोक्यात आला आहे, हेच यावरून दिसत आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे आव्हान
By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST