लांजा : शहरात राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत राजेशिर्के यांनी लांजा तहसीलदार यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी केली आहे. आठ दिवसांमध्ये रस्त्याचे काम न केल्यास खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नायब तहसीलदार उज्ज्वला केळूस्कर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ६६चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे लांजा शहरात पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. पर्यायी रस्ता हा फक्त माती व खडीने तयार केला गेल्याने पडलेल्या पावसामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तसेच संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच चिखलामुळे दुचाकी घसरून अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली. त्याबरोबर शहरामध्ये पायी प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर वाहनांमुळे चिखल उडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लांजा शहरातील महामार्गावरील पर्यायी रस्त्याचे काम आठ दिवसांत पूर्ण न केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात इशारा असा देण्यात आला आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस अभिजीत राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, शहर युवकाध्यक्ष दीपक शेट्ये, मारुती गुरव, अनिकेत शेट्ये व दाजी गडहिरे उपस्थित होते.
------------------------------
लांजातील महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास वृक्षाराेपण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार उज्ज्वला केळूस्कर यांच्याकडे देण्यात आले़