रत्नागिरी : केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शिवाय गवताच्या ठोंबांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. म्हस्के यांनी दिली.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, संस्था, मंडळांना एक हेक्टरपेक्षा जमीन अधिक आहेत, त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून आतापर्यंत ६७ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, १०० ते ११० प्रस्ताव जमा झाल्यास ते एकत्रित करून पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार ते एक लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. १०० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. या निधीतून शेतकरी कुंपण, बियाणे, सिंचन, जमिनीची पातळी सुधारणे इत्यादी कामासाठी वापरू शकतात. शेतकरी स्वत:च्या जनावरांसाठी चारा ठेऊन उर्वरित चाऱ्याची विक्री करता येऊ शकते. गतवर्षी किलोला साडेतीन रूपये दर देण्यात आला होता. पडिक जमीन, कलमांच्या बागेत, भात जमिनीच्या बांधावर गवताची लागवड करण्यात येते. यावर्षी सहा लाख ‘यशवंत-जयवंत’ गवताचे ठोंब वितरीत करण्यात येणार आहे. एक लाख चार हजार गवताचे ठोंब रत्नागिरी तालुक्यात वाटप करण्यात आले. जांभरूण, वेतोशी, खरवते, मालगुंड, जाकादेवी, फणसवळे, वाटद-खंडाळा, हरचेरी, डोर्ले, पावस येथे गवताचे ठोंब वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय पशुधन अभियानास रत्नागिरीत प्रारंभ : म्हस्के
By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST