चिपळूण : शहरातील पेठमाप रस्त्याला डॉ. नूरमहंमद सरगुरोह यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी ३ वेळा पत्रव्यवहार करूनही हा विषय सभेत घेण्यात आला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम आक्रमक झाले. त्यांना शांत राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी करुनही ते गप्प बसले नाही. अखेर पोलीस बंदोबस्त बोलावून त्यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे सभेचे कामकाज दोन तास तहकूब करावे लागले. नगरपरिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता सर्वसाधारण सभा सुरू झाली. प्रथम मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मुकादम यांनी प्रश्न उपस्थित केला. सरगुरोह एक सेवाभावी डॉक्टर होते. त्यांचे नाव फरनी ते पेठमाप या रस्त्याला देण्यात यावे. यासाठी ३ वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र, आजच्या सभेत हा विषय टाळण्यात आल्याने मुकादम आक्रमक झाले. तुम्ही शांत बसा, असे नगराध्यक्षा होमकळस वारंवार सांगत होत्या. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही सभागृहाचा वेळ फुकट घालवू नका. सभागृहाबाहेर जा, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु सभागृहाचा मान ठेवून अर्धा तास बाहेर जाऊन परत येतो, असे ते म्हणाले. मात्र, यावर सत्ताधारी नगरसेवकही आक्रमक झाले. ते सभागृहाबाहेर गेलेच पाहिजेत, अशी भूमिका नगरसेविका शिल्पा सप्रे, अदिती देशपांडे यांनी घेतली. त्यामुळे नगराध्यक्षा होमकळस यांनी सभेचे कामकाज थांबवले. नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असेही गटनेते राजेश कदम म्हणाले. या साऱ्या प्रकारात दोन तास गेले. शहरातील मुख्य ११ रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण होणार असून, यासाठी ३ कोटी ३५ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत ही कामे होणार आहेत. या कामावरही चर्चा झाली. शहर व परिसरात अंदाजे १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी अंदाजे १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाला यापूर्वी सर्व्हे झाला होता का? असा प्रश्न नगरसेविका आदिती देशपांडे यांनी केला.यावर माजी पाणीपुरवठा सभापती लियाकत शाह म्हणाले की, आम्ही जनतेची कामे करण्यासाठी आहोत. कोणत्याही कामाचं श्रेय घेण्यासाठी आमचा प्रयत्न नाही. या कामाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. (वार्ताहर)नगर परिषदेत सीसीटीव्ही बसवूनही चोरीचे प्रकार कमी झालेले नाहीत. एखाद्या कामाची माहिती मागूनही ती देण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप नगरसेवक अविनाश केळसकर यांनी केला. संबंधित खातेप्रमुखांनी माहिती देणे आवश्यक आहे. मुख्याधिकाऱ्यांना माहिती देण्याचे बंधन नाही, असे डॉ. पाटील म्हणाले. त्यामुळे नगरसेवक शशिकांत मोदी, मिलिंद कापडी, राजू देवळेकर संतप्त झाले. या विषयावर मुख्याधिकाऱ्यांनी प्रयत्न करुनही नगरसेवकांत एकमत झाले नाही.नगराध्यक्षा होमकळस यांनी अखेर पोलिसांना पाचारण केले. पोलीस कर्मचारी सभागृहात आल्यानंतर त्यांनी मुकादम यांना बाहेर जाण्याची विनंती केली. सभागृहाचा आदर राखून आपण बाहेर जात आहोत. कुणीही अंगाला हात लावू नका. आपणास बाहेर काढण्याची प्रक्रियाही नियमाला धरुन नाही. या प्रकाराचा आपण निषेध करीत आहोत, असे सांगून नगरसेवक मुकादम हे अखरे सभागृहाबाहेर पडले.
मुकादमांना सभागृहाबाहेर हाकलले
By admin | Updated: November 3, 2015 00:01 IST