मेहरुन नाकाडे, रत्नागिरी :अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी कोकणात मान्सून यायला ७ जूनच उजाडणार आहे. अंदमान बेटावर दाखल झालेला मान्सून पुढे मात्र हळूहळू सरकणार आहे. त्यामुळे तो कोकणात दाखल होण्यास एवढा कालावधी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: २० मे रोजी अंदमानात दाखल होतो. मात्र, यावर्षी तो अगोदरच दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत तो अंदमानच्या उर्वरित भागात दाखल होणार आहे. तिथून पुढे तो केरळ व त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्या अंदमान परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंदमानमध्ये पाऊस अगोदर दाखल झाला असला तरी पुढे मात्र त्याचा प्रवास लांबणार आहे. केरळमध्ये ५ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल. त्यानंतर तो महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातही मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. गेले दोन ते तीन दिवस जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरूपात पाऊस झाला आहे. मात्र, या पावसाचा मान्सूनशी काडीमात्रही संबंध नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अंदमानात पाऊस दाखल झाला असल्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस मात्र चांगलाच बरसत आहे. पावसामुळे आंबा पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबापीक शेतकर्यांच्या हाती येणे मुश्किल झाले आहे. पावसामुळे उंच झाडावर चढणे शक्य होत नाही; तसेच आंबे पिकून गळत आहेत. परिणामी शेतकर्यांना त्यांची आर्थिक झळ बसली आहे.
कोकणात मान्सून येण्यास ७ जून उजाडणार!
By admin | Updated: May 22, 2014 00:53 IST