रत्नागिरी : रत्नागिरी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शहरातील कोरोनाच्या आरटीपीआर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. या दृष्टीने रत्नागिरी नगर परिषद व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरते कोरोना चाचणी पथक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग आणि रत्नागिरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रत्येक प्रभागातील एका विशिष्ट ठिकाणी व दिवशी फिरत्या पथकाद्वारे आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्याच टप्प्यावर निदान होऊन योग्य उपचारामुळे होणारी संभाव्य जीवित हानी टळू शकेल.
संशयित तथा सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी आपल्या नजीकच्या ‘फिरते कोरोना चाचणी पथकामध्ये’तपासणी करून या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, अमे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हे पथक सोमवार ते रविवार असे संपूर्ण आठवडाभर विविध ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत तपासणी करणार आहे.
रत्नागिरीतील तपासणी केंद्रे अशी - सोमवार - अ. के. देसाई हायस्कूल, मंगळवार- नगर परिषद कर्मचारी वसाहत (धनंजय कीर सभागृह), बुधवार - जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदिर, गुरुवार - नगर परिषद शाळा क्र. १, गाडीतळ जवळ., शुक्रवार - नगर परिषद शाळा क्र. ८, भैरी मंदिर जवळ. शनिवार - भागेश्वर विद्यामंदिर किल्ला, शाळा क्र. ९. रविवार - नगरपरिषद शाळा क्र. ३, चवंडेवठार