रत्नागिरी : पूरग्रस्त भागात आराेग्य शिबिरादरम्यान टीटीच्या इंजेक्शनची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेप्रणित माताेश्री ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि कामगार सेना अध्यक्ष डाॅ. मनाेज चव्हाण यांनी ही इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. ही इंजेक्शन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे देण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, पूरग्रस्त भागात मदतीचे वाटप केले जात आहे. मनसेप्रणित मातोश्री ट्रस्टतर्फे पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरांदरम्यान पूरग्रस्त भागामध्ये टीटीच्या इंजेक्शनची गरज असल्याचे लक्षात आले. चव्हाण यांनी मनसेचे अरविंद मालाडकर यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. त्यावेळी आरोग्य विभागाकडे या इंजेक्शनची कमतरता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी लायन्स क्लब ऑफ ईस्ट बॉम्बेचे श्रीधर जगताप, मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे पाच हजार टीटीची इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली. त्यासोबतच पाच हजार सिरींजही उपलब्ध करून दिल्या. हे साहित्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण, संदीप परब, ट्रस्टचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा चिटणीस बिपिन शिंदे उपस्थित होते.