रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेना चिटणीस अनिरुद्ध ऊर्फ छोटू खामकर रत्नागिरी एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांना भेटी देणार असून तेथील कामगारांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांच्या सूचनेनुसार कामगार सेना चिटणीस अनिरुद्ध ऊर्फ छोटू खामकर रत्नागिरी एम आय डि सी मधील अनेक कंपन्यांना भेटी देणार आहेत. रत्नागिरी एमआयडीसीमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. परप्रांतीय कामगारांचे वाढणारे प्रमाण, परप्रांतीय कामगारांच्या तुलनेत स्थानिक तरुणांना मिळणार कमी पगार, स्थानिक तरुणांना सतत मिळणारा ब्रेक, वेळेवर पगार न होणे, ओव्हर टाईम न देता अधिक वेळ काम करून घेणे, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील घोळ अशा अनेक तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
अशा तक्रारी ज्या-ज्या कंपनीमधून येत आहेत त्यांच्या तक्रारींची शहानिशा करून त्यातून योग्य तोडगा काढणे व कंपनी तसेच कर्मचारी दोघांनाही टिकविण्यासाठी हा दौरा असल्याचे खामकर यांनी सांगितले. मनसे कामगार सेनेची कायदेशीर सल्लागार टीमही यावेळी उपस्थित असणार आहे. ज्यामुळे कामगार कायदा त्याची योग्य अंमलबजावणी होतेय का नाही याची पडताळणी करून त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत चर्चाही केली जाणार आहे. त्यामुळे ज्या कामगारांना अशाप्रकारच्या अन्यायाला तोंड द्यावे लागत असेल त्यांनी छोटू खामकर यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
हे अभियान दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण तसेच उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत यांच्यासोबत अनेक पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.