लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण व अडचणी समजून घेण्यासाठी गेलेले आमदार भास्कर जाधव यांच्यासमोरच तेथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अंदाधुंदी कारभार उघड झाला. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक ग्रामस्थांना शांत करून ही वेळ वादावादीची नाही, डॉक्टरांना मदत करण्याची आहे, असे आवाहन त्यांनी आपल्या शैलीत कर्मचाऱ्यांना दोन शब्द सुनावताच यापुढे असं होणार नाही, अशी कबुली डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाची माहिती घेत असताना काही त्रुटी जाधव यांच्या लक्षात आल्या. लस उपलब्ध झाल्याचे मेसेज रुग्णालयाचा सुपरवायझर त्यांच्या गावागावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक उशिरा पाठवतो. त्यामुळे पुढे हे मेसेज लोकांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या अवतीभवती असलेले लोकच लसीकरण करतात, अशा तक्रारी स्थानिक लोकांकडून समोर आल्या; परंतु ही वेळ वादावादीची नाही, डॉक्टरांना मदत करण्याची आहे, असे सांगून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविण्याची, त्यांना मदत होईल अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न जाधव करीत होते; परंतु ग्रामस्थांकडून वारंवार हा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनाही थोडी शंका आली. त्यांनी सुपरवायझरला विचारले असता मेसेज वेळेत पाठविल्याचे त्याने सांगितले; परंतु ज्यावेळी त्याच्या मोबाइलवरून पाठवला गेलेला मेसेज पाहिला तेव्हा त्याने केलेली लबाडी समोर आली. त्याने मेसेज सायंकाळी केला होता आणि सकाळी केल्याचे तो सांगत होता, हे पाहून जाधव संतापले आणि त्यांनी सुपरवायझरसह डॉक्टरांनाही चार शब्द सुनावले. संकटाचा काळ असताना असं बेजबाबदार वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी माजी उपसभापती शरद शिगवण, रवींद्र सुर्वे, रमेश रेपाळ, निवळीचे उपसरपंच गणेश विचारे आदी उपस्थित होते.
--------------------
चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला आमदार भास्कर जाधव यांनी भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली़