रत्नागिरी : पोलीसपाटील आणि सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर करून ग्रामसभेचे ठराव डावलल्याप्रकरणी चाफवली (ता. संगमेश्वर) ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले.चाफवलीत तंटामुक्त समिती स्थापनेसाठी २४ आॅगस्ट २०१३ रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या सभेत पाच व्यक्तिंची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आल्याने वाद निर्माण झाला. ग्रामस्थांनी तंटामुक्त समिती नको, म्हणून ठराव केला. यावर तरीही तोडगा म्हणून ३० आॅगस्ट २०१३ रोजी पुन्हा विशेष ग्रामसभा घेण्याचे सर्वानुमते ठरले. मात्र, ३० आॅगस्टची सभा आजपर्यंत झालीच नाही. सरपंच आणि पोलीसपाटील यांनी दुसरी ग्रामसभा न घेता आणि पहिल्या ग्रामसभेचा ठराव डावलून पदांचा गैरवापर करून आपल्या मनाप्रमाणे तंटामुक्त समिती नेमली, असा या ग्रामस्थांचा आरोप आहे. तंटामुक्त समिती ही तंटे मिटवण्यासाठी असते, याचा विसर पडलेल्या पोलीसपाटील आणि सरपंचांनी मनाला वाटेल त्याप्रमाणेच ही समिती नेमली, त्यावरील पदाधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.ग्रामसभेचा निर्णय डावलणाऱ्या व पदांचा गैरवापर करणाऱ्या चाफवली सरपंच आणि पोलीसपाटील यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात केली आहे. तसेच पोलीसपाटील इतर ठिकाणी नोकरी करीत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना गरजेच्या वेळी उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याचीही दखल घेण्याची मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर ८० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पोलीसपाटील, सरपंचांकडून गैरवापर
By admin | Updated: July 10, 2014 00:01 IST