चिपळूण : ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शासकीय कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी पोफळी एैनाचे तळे येथील धनगर समाजातील लोकवस्तीमध्ये घेण्यात आली. पोफळीसह परिसरातील ग्रामस्थांनी सभेचे कामकाज अनुभवले. जिल्हा परिषदेच्या मंजुरीने घेण्यात आलेल्या या सभेच्या नियोजनासाठी पोफळी ग्रामपंचायतीनेही हातभार लावला.चार वर्षापूर्वी वीर (ता. चिपळूण) येथे माजी सभापती सुरेश खापले यांच्या पुढाकाराने चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा घेण्यात आली होती. ग्रामीण भागातील लोकांना पंचायत समितीच्या सभेचे कामकाज समजावे, प्रशासनाचे कामकाज आणि लोकप्रतिनिधींची भुमिका या विषयाची नागरिकांना माहिती व्हावी. म्हणून ग्रामीण मासिक सभेचे आयोजन केले जाते. माजी सभापती खापले यांच्यानंतर विद्यमान उपसभापती सुचिता सुवार यांनी आपल्या भागातील लोकांना पंचायत समितीच्या सभेचे कामकाज समजावे म्हणून पुढाकार घेतला. सभापती बागवे, गटविकास अधिकारी गणेश पिंपळे यांनी त्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून मंजूरी मिळवली. त्यानूसार नियोजित सभा घेण्यात आली. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, कक्ष अधिकारी एस. टी. खाडे यांनी सभेच्या तयारीत लक्ष घातले. पोफळीचे सरपंच चंद्रकांत सुवार यांच्या धनगरवाडीतील निवासस्थानी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती समिक्षा बागवे होत्या. तालुक्यात ग्रामपंचायतीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे सभेत धोरणात्मक निर्णय सभेत झाले नाही परंतू सभेचा कामकाज कसा चालतो हे नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवले. कोणत्या कामासाठी कोणत्या विभागाकडे प्रस्ताव द्यावा, पाठपुरावा कुठे आणि कसा करावा, एखादा परिपूर्ण प्रस्ताव द्यायचा असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. याची माहिती ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारली. ग्रामस्थांच्या प्रश्नांची अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरे दिली. सभेच्या नियोजनासाठी सरपंच चंद्रकांत सुवार, उपसरपंच भिमराव बामणे, ग्रामसेवक अनिल शिंंदे, कोंडङ्खमधुकर इंदुलकर, उपसरपंच आनंद पवार, ग्रामपंचायत सदस्य बबन खरात, माजी सदस्य याकूब सय्यद, अनिल जाधव, गोविंद पंडव, संकेत सुवार आदींनी परिश्रम घेतले. त्याबद्दल पंचायत समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अभयदादा सहस्त्रबुद्धे यांनी याबाबतची सुचना केली. त्यानूसार सभापती, बागवे, उपसभापती सुवार यांनी सभेसाठी परिश्रम घेणाऱ्यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)
पंचायत समितीची सभा धनगरवाडीत अनुभवली
By admin | Updated: April 3, 2015 01:04 IST