शोभना कांबळे : रत्नागिरी ,सर्व जगात दरवर्षी सुमारे ६ लाख माता मृत्यू पावतात. त्यांना बऱ्याचदा दुसरा कोणताही आजार नसतो. परंतु गर्भारपण आणि प्रसुतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे गरोदर स्त्रीला प्रसुतिपूर्व आणि प्रसुतिपश्चात आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत. या भावी मातेची प्रसुती सुलभ व्हावी, तसेच तिला आरोग्यविषयक सुविधा वेळेवर मिळावी, यासाठी शासनातर्फे तिच्या घरापासून रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय वाहनांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या शासकीय वाहनाचा १७३१ मातांना आधार मिळाला आहे.पूर्वी घरच्याघरी प्रसुती होत असे. मात्र, गुंतागुंतीच्या वेळी तिला वेळेवर औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने त्या मातेचा किंवा तिच्या अर्भकाचा मृत्यू होत असे. त्यामुळे बाळंतपण काळात होणाऱ्या मातांच्या आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. ग्रामीण भागातून प्रसुतिगृहात आणणे वाहनाच्या अभावी अडचणीचे होत असे. प्रसंगी बाळ - बाळंतीण दगावण्याचाही धोका असे. मात्र, आता आरोग्य विभागाने भावी मातेचे आरोग्य, तिची प्रसुती सुलभ व्हावी आणि तिचे बाळ सुखरूप निपजावे, यासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. तिची प्रसुती रूग्णालयात सुलभ व्हावी, तिला वेळेवर आरोग्यसुविधा मिळावी, याकरिता रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी आणि तिला प्रसुतिनंतर घरी सोडण्यासाठी जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वेळेवर रूग्णालयात दाखल केल्याने तिची प्रसुती सुलभ होऊ लागली आहे. त्यामुळे मातेबरोबरच बाळाच्या मृत्यूचे प्रमाण आपोआपच कमी झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील गरोदर मातांना या वाहनाचा लाभ मिळू लागला आहे. या वाहनाचा एप्रिल ते जून २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १९२० दाखल झालेल्या मातांपैकी १७१३ मातांना या वाहनांचा आधार मिळाला आहे.तसेच या मातेचा आहार आणि आरोग्य यादृष्टीने तिला आर्थिक आधार देण्याच्या हेतूने शासनाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ गतवर्षी जिल्ह्यातील ४९७ मातांना मिळाला होता. ग्रामीण भागातील मातांना ७०० रूपये आणि शहरी भागातील मातांना ६०० रूपये, अशी आर्थिक मदत देण्यात येते. आरोग्य विभागाच्या या सुविधेमुळे भावी मातांना आणि त्यांच्या बालकांना जणू सुरक्षाकवच मिळाले आहे.
इथे जपली जाते मातृसुरक्षा
By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST