पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे रत्नागिरी शहरात दररोज १९ ते २२ टन ओल्या व सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. कचऱ्याचे हे मोठे प्रमाण लक्षात घेता कचरा निर्मुलनाची समस्या पुढे गंभीर बनू शकते. या पार्श्वभूमीवर यापुढे नवीन अपार्टमेंटला परवानगी देताना अपार्टमेंटच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणारे यंत्र बसवण्याची अट घातली जाणार आहे. तसेच जुन्या अपार्टमेंट्सनाही अशी यंत्र बसवण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गेल्याच महिन्यात महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीकडे तसेच शहरातील रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या मोकाट जनावरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. याआधी उपनगराध्यपदी असताना मयेकर यांनी मोकाट जनावरांविरोधातील मोहीम यशस्वीरित्या राबवली होती. शहरातील कचरा समस्या मोठी आहे. त्यामुळे या समस्येबाबत नेमकेपणाने काय करणार, असे विचारले असता शहरात होऊ घातलेल्या या नवीन प्रयोगाची माहिती त्यांनी दिली. ल्हास या कंपनीच्या प्रतिनिधींशी रत्नागिरीत या ओल्या कचऱ्यावरील खतनिर्मितीबाबत चर्चा झाली आहे. त्यांच्याकडील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती करणारी वेगवेगळ्या क्षमतेची यंत्र कंपनीने बनवली आहेत. प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात हे यंत्र बसवण्याबाबत पालिकेचा प्रस्ताव आहे. यापुढील नव्या अपार्टमेंटना परवानगी देताना असे यंत्र बसवण्याची अट घातली जाणार आहे. या यंत्राची किंमत ३ ते ४ लाख रुपये असून, हा खर्च बिल्डर करू शकतात किंवा ३० ते ३५ फ्लॅट असणाऱ्या अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकही प्रत्येकी १० ते १५ हजार भरून हे यंत्र त्यांच्या अपार्टमेंटच्या आवारात बसवू शकतात. दररोजचा ओला कचरा वेगळा करून तो या मशिनमध्ये टाकला की दुसऱ्या दिवशी त्याचे खतात रुपांतर होईल. या दररोज तयार होणाऱ्या खताचा वापर अपार्टमेंटच्या बागायतींसाठी, फ्लॅटच्या गॅलरीत असणाऱ्या फुलझाडांसाठीही केला जाऊ शकतो. अधिक प्रमाणात खत तयार झाल्यास त्याची विक्रीही केली जाऊ शकते. त्यातून या यंत्रासाठी लागणाऱ्या विजेचा खर्चही भागविला जाऊ शकतो. या योजनेमुळे पालिकेच्या कचरा विभागावर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल. कचरा जागच्या जागी नष्ट होईल. सुका कचरा जाळून टाकता येईल किंवा पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांना देता येईल. दांडेआडोम येथे कचऱ्यावरील खतनिर्मिती प्रकल्पाचे काय झाले, असे विचारता मयेकर म्हणाले, तेथे रस्त्याच्या जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. परंतु रत्नागिरीत हा नवीन प्रयोग यशस्वी झाला तर अन्यत्र कचऱ्यावरील प्रकल्प राबवण्याची वेळही येणार नाही. कारण जागच्याजागीच कचरा नष्ट होईल. खतात रुपांतरीत होईल. जुन्या अपार्टमेंटसच्या आवारातही अशी यंत्र बसवण्यासाठी जागृती केली जाईल. त्यासाठी काही सवलत योजनाही उपलब्ध केल्या जातील. - प्रकाश वराडकरया प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कंपोस्ट खत तयार झाले तर त्याचा वापर पालिकेच्या विविध उद्यानांमधील झाडांसाठी केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या यंत्राचा वापर करावा, यासाठी घरफाळामध्ये काही टक्के सवलत देण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, त्याबाबत कायदेशीर बाजू तपासून पाहाव्या लागतील.-महेंद्र मयेकर, नगराध्यक्ष, रत्नागिरीरत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी आणला अनोखा प्रस्तावरत्नागिरी शहरात सर्वप्रथम नवीन भाजी मार्केट व मच्छी मार्केट येथे पालिकेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणारी यंत्र प्रायोगिक तत्त्वावर बसवली जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणी दरदिवशी दोन टनपेक्षा अधिक ओला कचरा जमा होतो. आठवडा बाजार दर शनिवारी भरतो. यादिवशी तालुक्यातील जनता बाजारहाट करण्यास या बाजारात येते. त्यामुळे आठवड्यातून एकदा येथे ७ ते ८ टनांपेक्षा अधिक ओला कचरा जमा होतो. मारुती मंदिर भाजीमार्केटजवळ ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्याची यंत्र बसविल्यानंतर हा कचरा लगतच्या यंत्रामध्ये आणून टाकला जाईल. त्यामुळे तेथे सर्वप्रथम ही यंत्र बसवली जातील. या प्रयोगाची निरिक्षणे घेतली जातील व त्यानंतर शहरातील अन्य अपार्टमेंट्सच्या आवारात ही यंत्र बसवण्याबाबत निर्णय घेऊन ल्हास कंपनीला त्याबाबतचे काम दिले जाणार आहे. कचऱ्यावरील प्रक्रियेचा हा प्रयोग नक्की यशस्वी होईल, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले.
अपार्टमेंटच्या आवारातच होणार खतनिर्मिती
By admin | Updated: August 18, 2014 21:36 IST