मार्लेश्वर : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गायमुखाजवळ हजारो पर्यटक थांबतात. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. निदान महिलावर्गासाठी फायबर मोडमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे. घाटमाथ्यावरून कोकणात यायचे असल्यास रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजे गायमुख आहे. या ठिकाणाहून नयनरम्य निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येक प्रवासी, पर्यटक गायमुखाजवळ थांबतात. या ठिकाणी बारमाही मुबलक पाणी आहे. क्षणभर विश्रांती घेण्यासाठी पर्यटकांचे पाय गायमुखाजवळ रूततात. याठिकाणी मंदिर असून, या देवतेचे मनोभावे दर्शन घेऊन पुढील प्रवास प्रत्येकजण सुरू करतो.राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची सतत ये - जा असते. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी, दसरा आदी सणांसह, मे महिन्याच्या सुटीमध्ये चाकरमानी गावी परतात. सण व उत्सव कालावधीत गायमुखाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृहाअभावी त्यांची कुचंबना होत आहे. स्वच्छतागृहासाठी पाणीही उपलब्ध आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष केंद्रीत करून फायबर मोडचे किमान एकतरी स्वच्छता उभारण्यात यावे, अशी मागणी आर्ते यांनी केली आहे. आर्ते यांनी केलेल्या मागणीची दखल कधी घेतली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
आंबा घाटात स्वच्छतागृह आवश्यक
By admin | Updated: August 4, 2015 23:50 IST