चिपळूण : अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गावांमध्ये आंबा पिकाची हानी झाली आहे. आंबा गळून पडल्यामुळे हजारो टन आंबा खराब झाला आहे. तो आंबा कॅनिंगसाठी विकण्यासाठी नेला जात आहे. पण वजनावर आंबा खरेदी करणार्या व्यापार्यांनी दर १० रुपयांपर्यंत खाली आणला आहे. कॅनिंगच्या आंब्यासाठी ३० रुपये भाव मिळत आहे. पण हा भाव आता १० रुपये किलोवर घसरला आहे. धामणवणे येथील नंदू साडविलकर यांची आंबा बाग असून १० हजार किलो आंबा वादळामुळे गळून पडला आहे. तालुक्यात काही शेतकर्यांच्या अंदाजानुसार किमान एक लाख किलो आंबा गळून पडला आहे. हा आंबा कॅनिंगसाठी घेतला जातो पण यावर्षी त्यामध्येही नुकसान होत आहे. ऐन हंगामात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. कॅनिंगसाठी आंबा नेला तर दर मिळत नाही, म्हणून पडलेल्या आंब्याची वर्गवारी करुन तो आढी लावून पिकविण्याचा उपाय करावा तर त्यामध्येही झाडावरून पडलेला आंबा आढीमध्ये पिकत नाही. तो जर पिकवला तर त्याचा रसही चवदार नसतो. कॅनिंगसाठी पडलेला आंबा कमी भावाने घेतला जात आहे. धामणवणे, टेरव, रामपूर, कोंढर ताम्हाणे, मार्गताम्हाणे, तनाळी, गुढे, मिरवणे कळंबट, मोरेवाडी या गावांमध्ये पडलेल्या आंब्याचा खच पाहून शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
चिपळुणात आंब्याचा दर १0 रूपयांवर
By admin | Updated: May 11, 2014 00:07 IST