श्रीकांत चाळके- खेड-शिवछत्रपतींच्या पराक्रमाने स्मरणात राहिलेल्या खेड तालुक्यातील ‘महिपतगड’ या किल्ल्यावर जाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याची वाताहात झाली आहे.५ कोटी ५० लाख रूपये एवढा खर्च या रस्त्यावर होणार आहे़ मात्र, ठेकेदाराने पैसे घेऊन निम्मे कामदेखील पूर्ण केलेले नाही. जे काम केले गेले ते निकृष्ट दर्जाचे असल्याने, या भागात असलेल्या धनगर समाज बांधवांची पायपीट चालूच आहे. यामुळे, हे काम घेणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे़‘महिपतगड’ येथील मौजे बेलदारवाडीतील ग्रामस्थांची या रस्त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. रस्त्याचे काम गेली १२ वर्षे अपूर्ण आहे. ठेकेदार विष्णू पवार हे या रस्त्याचे काम करीत आहेत़ या कामाचे भूमिपूजन रामदास कदम यांचे हस्ते झाले व त्यांनीच या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची आठवण येथील ग्रामस्थांनी करून दिली आहे. या रस्त्याच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे़ तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी कदम यांनीच निधी मंजूर केला होता़ २२०० मीटरचे रस्त्याचे काम ठेकेदाराने अद्याप केलेले नाही़ या रस्त्यांमुळे वाडीबेलदार येथील धनगर वस्तीतील १०० ग्रामस्थांना ये - जा करणे अवघड बनले. तालुक्यातील महिपतगड येथील गडावर जाणाऱ्या रस्त्याचे काम गेली बारा वर्र्षे अर्धवट स्थितीत असल्याने, त्या पट्ट्यात राहणाऱ्या धनगर समाज बांधवांना मुलभूत सोयींपासून वंचित रहावे लागले आहे. संबंधित ठेकेदाराने मुदतीत हे काम न केल्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी अशी चर्चा होत आहे.
‘महिपतगड’ रस्त्याचे काम रखडवले
By admin | Updated: January 17, 2015 00:10 IST