खेड : वीजचोरी करणाऱ्यांच्या विरोधात महावितरणच्या पथकाने दंड थोपटले आहेत. २०१३ - २०१४ या आर्थिक वर्षात खेड तालुक्यात पथकाने २९८ वीजचोऱ्या पकडल्या. यातील ४२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ४३ लाख १२ हजार १३३ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़महावितरणकडून दंड ठोठावलेल्यांपैकी २८ जणांकडील ७ लाख ६ हजार रूपये दंड थकीत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ खेड उपविभागाकडून २२५ आणि लोटे उपविभागाकडून ७३ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यातील सर्वांत अधिक चोऱ्या जून महिन्यात उघडकीला आल्या. त्यात भोस्ते, भरणे, फुरूस, खेड, सवणस, घाणेखुंट, कर्जी, संगलट, नांदाव, आंबवली, पिरलोटे-मेटे, कोतवली आणि बोरज आदी गावांचा समावेश आहे. लोटे उपविभागात ७३ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. सध्या फिडरनिहाय तपासणी होत असल्याने वीजचोरी पकडणे सोपे जात असल्याचे महावितरणचे सहायक अभियंता कदम यांनी सांगितले. राज्यात वीजेचे संकट असताना दुसरीकडे मात्र अशा चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे पहायला मिळते आहे असे वीज वितरणने सांगितले आहे.
खेडमध्ये महावितरणचा ४३ लाखांचा दंड
By admin | Updated: July 4, 2014 23:59 IST