प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -जिल्ह्यात चार नगरपरिषदांसाठी येत्या नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी प्रभाग आरक्षण सोडत झाली आहे. आता थेट नगराध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज रांगेत आहेत. मात्र, या पदासाठी आरक्षण सोडत होणार की नाही, याबाबत संभ्रम असून, त्यामुळे इच्छुकांच्या पोटात भीतीने गोळा आला आहे. पाच वर्षांसाठीची थेट नगराध्यक्षपदाची संधी आरक्षण सोडत झाल्यास हातची जाईल, अशी धास्ती काही मातब्बरांना वाटत आहे. रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण या चार नगरपरिषदांमध्ये येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तयारी प्रशासनस्तरावरही सुरू झाली आहे. प्रभागरचना, वॉर्डरचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे आधीच या निवडणुकीतील इच्छुकांची आपल्या वॉर्डात कोण किती पाण्यात याची चाचपणी करताना भंबेरी उडत आहे. काहींचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांच्याकडून दुसऱ्या सुरक्षित वॉर्डचा शोध घेतला जात आहे. मात्र, ज्याचे आधीच त्या ठिकाणी बस्तान आहे, त्याला बाजूला करून उमेदवारी मिळवणे सोपे नसल्याने आरक्षित वॉर्डमधील इच्छुक धास्तावले आहेत. रत्नागिरीत २००० मध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले उमेश शेट्ये हे अनुभवी नेते आहेत. त्या काळातील त्यांचे विकासकामांचे रिपोर्टकार्ड चांगले असल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीतूनच थेट निवडणुकीस इच्छुक आहेत. मात्र, त्यावेळेप्रमाणे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस शहरात तितकी सशक्त नाही. त्यामुळे त्यांची वन टू का फोर रणनीती यावेळी उपयोगी पडणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सेनेचे राहुल पंडित, मिलिंद कीर, बंड्या साळवी नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. सेनेचे शहरातील बळ सर्वाधिक आहे. भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत झाल्यास व महिलांसाठी हे पद आरक्षित झाल्यास इच्छुक असलेल्या अनेकांची अडचण होणार आहे. तसे झाल्यास भाजपच्या शिल्पा पटवर्धन, प्रज्ञा भिडे यांच्याबरोबरच आणखीही काही नावे थेट नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. खेड, राजापुरातही अनेक इच्छुक आहेत.नगराध्यक्षपद : रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेडमध्ये चुरस...थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चिपळूण नगरपरिषदेत सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. चिपळूण हे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गेल्या वेळी नगरपरिषद निवडणुकीत याठिकाणी राजकीय उलथापालथ झाली होती. आता थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. चिपळूणच्या थेट नगराध्यक्षपदासाठी अनेकांची नावेचर्चेत आहेत. भाजपतर्फे रश्मी गोखले व बाबू तांबे, राष्ट्रवादीतर्फे सुचयअण्णा रेडीज, सेनेतर्फे बाळा कदम व माधुरी पोटे, तर कॉँग्रेसतर्फे संयज रेडीज, लियाकत शहा व माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांची नावे चर्चेत आहेत. राजापूरच्या नगराध्यक्षपदासाठी कॉँग्रेसचे हनीफ काझी, जमीर खलिपे, सेनेचे अभय मेळेकर, भाजपच्या शीतल पटेल यांची नावे चर्चेत आहेत.
थेट नगराध्यक्ष निवडणूक इच्छुकांच्या पोटात गोळा!
By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST