शृंगारतळी : चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील चौदा गावांत होणाऱ्या नियोजित औद्योगिक वसाहतीसंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे़. ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयात येऊन धडकल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित पत्र बनावट असून, मागण्यांबाबत कोणतीच बैठक झाली नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीची बैठक घेऊन या प्रकाराबाबत निषेधही करण्यात आला. या पत्रामुळे परिसरातील वातावरण तणावाचे बनले आहे. संघर्ष समितीच्या या बैठकीला चौदा गावांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक चिखली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. गुहागर व चिपळूण तालुक्यातील चौदा गावांमधील साडेसात हजार एकर जमीन नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे. त्याला येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. चौदा गावांच्या जमीनधारकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने असे प्रकार जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. यामुळे खळबळ माजली आहे. येथील भूसंपादनाबाबत संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शिर्के, डॉ. जगदीश पाटेकर, प्रमोद शिर्के, प्रभाकर शिर्के, मधुकर माने, अशोक भडवळकर, राजाराम मोरे, अजित बेलवलकर, वीरूशेठ मोरे, लतिफ लालू, भगवान कदम आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
महामंडळाचे पत्र दिशाभूल करणारे
By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST