दापाेली : टँकरमुक्त जिल्हा हाेण्यासाठी प्रत्येकाने थेंबा थेंबाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळले तरच पाण्याची बचत हाेण्यास मदत हाेईल. पाणी साठवणूक करण्यासाठी बंद चिरेखाणीचा वापर केला तर पाण्याची साठवणूकही करता येईल, असे मत जलप्रेमी आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले.
टँकरमुक्त जिल्हा कसा करता येईल आणि प्लास्टिक कचऱ्यापासून जिल्हा कसा मुक्त होऊ शकतो याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या दालनात जलप्रेमी व निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांच्या विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपाध्ये, वरिष्ठ भूवैज्ञानिक माने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा घडवून आणून एक नवा आशावाद दिला. यानुसार एक ते पंधरा एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे आणि पंचवीस मे पर्यंत सर्व घरांच्या छपरांवर पडणारे पाणी जमिनीत जिरविण्याबाबत मोहीम आखण्याबाबत विचारविनिमय झाला. तसेच विहीर व बोअरवेल पुनर्भरण, फेरोसिमेंट साठवण टाकी, बंद चिरे खाणीचा वापर पाणी साठवणुकीकरता कसा करता येतो, तसेच कचऱ्याच्या नियोजनाकरिता संकलन केंद्राची कशी निर्मिती करावी याबाबत चर्चा करण्यात आली.