वाहनांची कोंडी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. आधीच दोन्ही बाजूकडून एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यात आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
‘बेस्ट टीचर्स’ म्हणून सन्मानित
रत्नागिरी : लीफ फाॅरवर्ड या संस्थेकडून तालुक्यातील बसणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा घाग यांना ‘बेस्ट टीचर्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मुलांचा उत्तम सहभाग व प्रगतीचा आलेख पाहून लीफ फाॅरवर्ड या संस्थेकडून बसणी शाळा व शिक्षिका घाग यांना गाैरविण्यात आले.
टिके ग्रामपंचायतीतर्फे सर्वेक्षण
रत्नागिरी : तालुक्यातील टिके ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सरपंच साक्षी फुटक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन गट स्थापन करण्यात आले असून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची ऑक्सिजन पातळी, तापमान, सहा मिनिटे वाॅक टेस्ट घेण्याचे नियोजन करून तपासणी सुरू आहे.
मातोश्री ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा
खेड : तालुक्यातील संगलट येथील चार वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष व मातोश्री सेवादान आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त तसेच पाणीदूत मनोज चव्हाण यांच्या माध्यमातून चार वाड्यांसाठी दीड महिना पाण्याचा टॅंकर उपलब्ध केला आहे.
आरोग्य केंद्राचा आढावा
खेड : तालुक्यातील आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोना साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. आमदार योगेश कदम यांनी माहिती घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे उपस्थित होते.
पालशेतमध्ये निर्बंध
गुहागर : परजिल्ह्यातून येणारे चाकरमानी व इतर नागरिकांसाठी पालशेत ग्रामपंचायतीने कडक निर्बंध लागू केले आहेत. ॲन्टिजन टेस्टसह पाच दिवसांचा क्वारंटाईनचा नियम करण्यात आला असून त्यांची व्यवस्था गावाच्या मराठी शाळेमध्ये करण्यात आली आहे.
नालेसफाई सुरू
रत्नागिरी : पावसाळा तोंडावर असल्याने रत्नागिरी नगरपरिषदेकडून नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू असून, पावसाळ्यात शहरातील एकही नाला तुंबू द्यायचा नाही, असा निर्धार नगरपरिषदेने केला आहे. नागरिकांच्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी सोडविण्यात येत आहेत.
लसीकरणात सुसूत्रता आणावी
चिपळूण : कोरोना लसीकरणासाठी तालुका आरोग्य विभागाने योग्य नियाेजन केलेले नाही, तालुका आरोग्य विभागाने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. ज्येष्ठांना प्रथमप्राधान्य देण्यात यावे. शिवाय ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य द्यावे.
बाजारपेठेत गर्दी
रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढतच आहे. शासनाचे कडक निर्बंध असतानाही सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी विशेष गर्दी होत आहेच.