चिपळूण : शहरातील पवन तलाव मैदानावरील शॉपिंग सेंटरमध्ये सुरू असलेले नागरी लसीकरण केंद्र आता एल टाईप शॉपिंग सेंटरमध्ये सुरू करण्यात आले आहे. या नवीन केंद्राचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
पवन तलाव मैदानावरील शॉपिंग सेंटर येथील केंद्रात सुरुवातीला केवळ १५० लस उपलब्ध होत होत्या. मात्र, आता वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत २०० डोस दिले जात आहेत. यामध्ये १०० डोस दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांना, तर १०० डोस पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना दिले जात आहेत. मात्र, आता या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर नगर परिषदेने त्याची गंभीरपणे दखल घेत हे नागरी आरोग्य केंद्र शहरातील एलटाईप शॉपिंग सेंटर येथे स्थलांतरित केले आहे. या नवीन केंद्रात तूर्तास ७० खुर्च्या, पंखे, पाण्यासाठी कुलर व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. लस उपलब्ध होताच या नवीन केंद्रात लसीकरण सुरू केले जाणार आहे.
या केंद्राच्या शुभारंभप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक कबीर काद्री, स्वाती दांडेकर, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेविका सुरय्या फकीर, सई चव्हाण, आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका व डॉ. श्वेता देशमुख उपस्थित होते.
............................
चिपळूण नगर परिषदेच्या एल टाईप शॉपिंग सेंटरमधील केंद्राच्या शुभारंभावेळी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी डॉ. वैभव विधाते, डॉ. ज्योती यादव, शशिकांत मोदी, कबीर काद्री, स्वाती दांडेकर उपस्थित होते.