चिपळूण : सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दरडमुक्त सह्याद्री अभियानाचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सृष्टीज्ञान संस्था, मुंबई आणि सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दरड उत्पात आणि पुराचे संकट’ या विषयावर आंगवली पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि प्रमुख ग्रामस्थांबरोबर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वनालिका या अणेराव ॲग्रो फार्मच्या मारळ येथे पार पडली.
आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले की, चिपळूणमधील तिवरे गावातील बांबूच्या बेटांमुळे दरड उत्पातातून वाचलेली घरे मी डोळ्याने पाहून आलो आहे. त्यामुळे मातीची धूप आणि दरड उत्पात रोखण्यासाठी बांबूसारख्या स्थानिक प्रजातींची लागवड हाच सर्वोत्तम उपाय आहे असे सांगितले. त्यांच्या हस्ते बांबूच्या रोपांचे रोपण करून दरडमुक्त सह्याद्री अभियानाची सुरुवात झाली. सृष्टीज्ञान संस्थेच्या या कामात लागेल ती सर्व शासकीय तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या संपूर्ण जगाला ग्रासलेल्या समस्यांचे पडसाद कोकणातही अनुभवायला मिळत आहेत. अनियमित पाऊस, ढगफुटी, पूर, वादळांची वारंवारता अशा आपत्ती नित्याचा भाग होऊन गेल्या आहेत.
अगदी यावर्षी सुद्धा जूनच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या तौक्ते वादळाने कोकणची दाणादाण उडवून दिली. दि. २१, २२ आणि २३ जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने कोकणात दाखवलेले निसर्गाचे रूप खूपच भयावह होते. यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि सह्याद्री संकल्प सोसायटी संस्थेचे अध्यक्ष संजीव अणेराव यांच्या पुढाकाराने दरड उत्पाताची कारणे समजून घेणे व त्यावर उपाययोजना आखण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सृष्टीज्ञान संस्थेचे अध्यक्ष विजय जावळेकर आणि अशोक अणेराव यांनी या करारनाम्यावर स्वाक्षरी केली आणि त्याच्या प्रती आमदार शेखर निकम यांनी त्यांना प्रदान केल्या. या परिषदेला जिल्हा परिषद सदस्य मुग्धा जागुष्टे तसेच संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने उपस्थित होते.