सुभाष कदम ल्ल चिपळूण मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६वर गेल्या तीन वर्षांत विविध गुन्हे करणार्या २२ हजार ८०३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व अशा चालकांना २४ लाख ७३ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई कशेडी वाहतूक मदत केंद्रातर्फे करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भागवत यांनी दिली. महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पत्रकारांच्या कृती समितीने आंदोलन केले होते. मोरवंडे ते कशेडी दरम्याने असणारा महामार्ग वळणावळणाचा व घाटाचा आहे. या रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज नसताना अनेक चालक बेदरकारपणे वाहने चालवून अपघातास निमंत्रण देतात. यात अनेक बेकसूर लोक मारले जातात. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. महामर्गावर कार किंवा लहान गाड्या चालविणार्या चालकांची घाई मोठी असते. ‘अति घाई, संकटात नेई’ याची जाणीव असतानाही नवशिक्षित किंवा प्रशिक्षण न घेतलेले चालक कशीही गाडी घुसवून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अतिउत्साह त्यांना नडतो. हे असे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. सीट बेल्ट न लावणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे., दारु पिऊन वाहन चालविणे, गाडीत कागदपत्र न ठेवणे किंवा कागदपत्र गहाळ होणे, विमा, पीयुसी नसणे, तांत्रिक बिघाड असणे, वाहतुकीचे नियम तोडणे यामुळे वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. तीन वर्षांत पोलिसांनी २२ हजार ८०३ केसेस करुन २४ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलीस सातत्याने कारवाई करुनही वाहन चालकांच्या वर्तनात फारसा बदल आढळत नाही. त्यामुळे सातत्याने ही कारवाईची प्रक्रिया सुरुच राहाते. सध्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालकांना वाहतूक पोलीस पुरेशा सूचना देतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडून चुका करणार्या मोटार वाहन चालकांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. महामार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बांधण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. सज्ज रुग्णवाहिका ठेवलेल्या असतात. शासनस्तरावर चौपदरीकरणाचे कामही प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहनचालकानी नियमांचे पालन केल्यास व सावधानतेने वाहन चालविल्यास अपघातचे प्रमाण नियंत्रित होऊ शकते.
दंडापोटी २५ लाख जमा तीन वर्षात २२,८०३ केसेस दाखल
By admin | Updated: May 24, 2014 01:09 IST