रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी बी. के. कुरतडकर यांची नियुक्ती मुंबई विभाग नियंत्रकपदी झाली आहे. सोमवारपासून ते मुंबई विभाग नियंत्रकपदी रूजू होणार आहे.बी. के. कुरतडकर यांची १९७६ साली जिल्हा कोषागार कार्यालयात कारकूनपदी निवड झाली होती. मात्र कुरतडकर १९७७ साली राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात लिपिक टंकलेखक म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांना सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक पदी पदोन्नती मिळत गेली. १९९९ साली ते राजापूरमध्ये आगार व्यवस्थापक म्हणून हजर झाले. त्यानंतर त्यांनी कळंब (उस्मानाबाद) येथेही आगार व्यवस्थापकपदी काम पाहिले. २००१ साली रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून अधिभार घेतला. तीन वर्षाच्या सेवेनंतर त्यांची कोल्हापूर येथे वरिष्ठ आगार व्यवस्थापक पदावर बदली झाली. त्यानंतर पुन्हा ते रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिकारीपदावर हजर झाले होते. कामातील वक्तशीरपणा, प्रामाणिकता व कर्मचाऱ्यांशी असलेल्या सौजन्यशीलतेमुळे त्यांना वरिष्ठ अधिकारीपदापर्यत पोहोचता आले. विभागिय वाहतूक अधिकारी बी. के. कुरतडकर यांनी आपल्या पदाची सूत्रे विभागनियंत्रक के. बी. देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी यांनी भेटून कुरतडकर यांना शुभेच्छा दिल्या. कुरतडकर हे रविवारी मुंबईकडे रवाना होणार असून सोमवारपासून विभाग नियंत्रकांची सूत्रे स्वीकारणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबई विभाग नियंत्रकपदी कुरतडकर
By admin | Updated: November 2, 2014 00:51 IST