रत्नागिरी : लांजा तालुक्यातील निवसर ते रत्नागिरीदरम्यान रो रो सेवेचे इंजिन बंद पडल्याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक दोन तास खोळंबली. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावर तीन, तर भोके स्थानकावर एक रेल्वे थांबविण्यात आली होती. सायंकाळी उशिरा रत्नागिरीतून इंजिन रवाना करण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरा ही वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे.शनिवारी सायंकाळी रो रो सेवेचे इंजिन निवसर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान बंद पडले. त्यामुळे कोकण रेल्वेचा मार्गच ठप्प झाला. कोणत्याही स्थानकामध्ये ही घटना घडली असती तर रेल्वेसेवेवर कोणताही परिणाम झाला नसता; मात्र मार्गातच ते बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे मंगला एक्स्प्रेस दोन तास, नेत्रावती एक्स्प्रेस अर्धा तास, तर केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस एक तास रत्नागिरी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व रेल्वेगाड्या मडगावकडे जाणार होत्या. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सर्वच मार्ग फुल्ल असल्याने हापा एक्स्प्रेस भोके स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. रत्नागिरी स्थानकातून इंजिन घटनास्थळी सोडण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरा ही वाहतूक सुरळीत होणार होती. (प्रतिनिधी)
इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
By admin | Updated: July 23, 2016 23:44 IST