चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर येथील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत आली. यामध्ये औरंगाबाद कोकण मित्रमंडळ व मुकुंदवाडी येथील डी. डी. फाऊंडेशननेदेखील चिपळुणात धाव घेत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह ब्लँकेट, चटईचे वाटप करून दिलासा दिला. या मदतीमुळे तालुक्यातील सुमारे ४०० पूरग्रस्त कुटुंब भारावून गेली.
दि. २२ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जीवनच उद्ध्वस्त झाले. पूर ओसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक, स्वयंसेवी संस्था व दानशुरांनी मदतीचा ओघ सुरू केला. यामध्ये औरंगाबादही मागे राहिलेले नाही. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या औरंगाबाद कोकण मित्रमंडळ व मुकुंदवाडी येथील डी. डी. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळुणात येत येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह अन्य साहित्याचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
ही मदत चिपळूण शहरासह मजरेकाशी, पेढेसह अन्य ग्रामीण भागात देण्यात आली. काही पूरग्रस्तांना रोख स्वरूपातदेखील मदत देण्यात आली. तसेच गोवळकोट येथील पूरग्रस्त व ज्यांची जनावरे वाहून गेली अशा शेतकऱ्यांना आणि कदम-बौद्धवाडी येथील १५ दरडग्रस्त कुटुंबांनाही मदतीचा हात देण्यात आला. यावेळी कोकण मित्रमंडळाचे सदस्य व डी. डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप डाखोळे, चंद्रकांत गंभीरराव, लक्ष्मण बुरटे, दिलीप भवर, प्रदीप पवार, नितीन वाघमारे, ॲड. मिलिंद पाटील, ज्ञानेश्वर ओळेकर, महेश लगड, मालती डाखोळे, सर्व मुकुंदवाडी गाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून मदत करण्यात आली. यासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट या संस्थेचेही विशेष सहकार्य लाभले.