चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडीचे सुपुत्र प्रदीप अनंत शिंदे यांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे उत्कृष्ट सेवेबद्दल विशेष गौरव पुरस्काराने ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सन्मान करण्यात आला. शिंदे हे वनविभागात सेवेत असून, ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानअंतर्गत वसई वन विभागात परिमंडल वनअधिकारीपदी कार्यरत आहेत. १९ वर्षे सैन्यदलात सेवा बजावल्यानंतर वन विभागात नऊ वर्षांपूर्वी रुजू झाले. वन विभागातील सेवेच्या माध्यमातून वन संरक्षण व वन्यजीव संरक्षण मोहिमेत उत्कृष्ट कार्य, सेवा केल्याबद्दल ठाणे येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ध्वजदिन निधी संकलन शुभारंभाच्या औचित्याने भारतीय सैन्यदल जवानांना मानवंदना करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. प्रदीप शिंदे नोकरीला नोकरी न समजता सेवाभावी कार्य समजून गेली ९ वर्षे वन्यसंरक्षण व वन्यजीव संरक्षण उपक्रम विविध अभियानांच्या माध्यमातून राबवित आहेत. त्यांच्या या कार्याची मागील वर्षी राज्य शासनाने विशेष दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्राद्वारे गौरव करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्यातर्फे ५ हजार रुपये व सन्मानपत्राद्वारे ठाणे उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी ठाणे शहर व ग्रामीण भागातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोळकेवाडीच्या शिंदेंचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान
By admin | Updated: December 10, 2014 23:55 IST