चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, असे वाटत होते. मात्र खड्डे बुजवण्याच्या कामाकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने चाकरमान्यांचा प्रवास या खड्ड्यांतूनच झाला. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरण्याबरोबरच छोटे-मोठे अपघात घडू लागले आहेत. पावसाचे वातावरण असल्याने खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. चिपळूण-गुहागर मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी होत आहे.