गणेशमूर्ती शाळेत लगबग
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती शाळेत कामाची लगबग वाढली आहे. शाडूच्या मूर्ती वाळण्यासाठी वेळ लागत असल्याने कामाला उशीर होत आहे. काही मूर्ती शाळेमध्ये रंगकाम सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे साहित्याची उपलब्धता उशिरा झाल्याने कामास विलंब होत आहे.
कवितांचे सादरीकरण
देवरूख : प्रसिद्ध कवी प्रा. वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील राष्ट्रीय सेवा दलाच्या शाखेतर्फे बुधवारी (दि. २५) वसंत बापट यांचा काव्य प्रवास व त्यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम होणार आहे.
रानभाज्या महोत्सव
मंडणगड : तालुका कृषी कार्यालयातर्फे तिडे आदिवासीवाडी येथे रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व वाढविण्यासाठी शासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काटवल, कर्टोली, दिंडा, टाकळा, कुडा, शेवगा, कुर्डू, आगाडा, सुरण, अंबाडी, अळू, काटेमाठ, खापरफुटी आदी भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
लांजा : महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, विषयाचे बंधन नाही. शब्दमर्यादा ७०० असून, पत्र मोबाइलवर टाइप करून स्पर्धा संयोजक प्रा. महेश बावधनकर यांना दि. ३१ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.