रत्नागिरी : केतन शेट्ये याने सेनेच्या रत्नागिरी युवा शहर अधिकारी पदाचा राजीनामा ७ आॅक्टोबरलाच दिला आहे. त्यामुळे त्याची हकालपट्टी केल्याची शिवसेना युवा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली घोषणा ही निव्वळ दिशाभूल आहे. ज्यावेळी मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझा मुलगा केतन शेट्ये यानेही सेना सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि राजीनामा रितसर देण्यात आला आहे. परंतु सेनेतील काही टीनपाट पुढाऱ्यांना आमचा प्रभाव, कर्तृत्व पाहावत नसल्यानेच त्यांनी हा कृतघ्नपणा केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. सेनेच्या शहर युवा अधिकारी पदावरून केतन शेट्ये यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करणारे पत्र युवा अधिकारी तुषार साळवी यांच्या नावाने सर्व प्रसार माध्यमांना रविवारी देण्यात आले होते. मात्र, हकालपट्टीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शेट्ये यांनी स्पष्ट केले. ज्या तुषार साळवी यांच्या नावाने हे पत्र आहे ते रविवारी रत्नागिरीबाहेर होते. त्यांनीच केतन शेट्ये यांना तुमचा राजीनामा आलेला असतानाही तुमची हकालपट्टी केल्याचे पत्र प्रसार माध्यमांना देण्यात आल्याचे रविवारीच सांगितले होते. त्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचे तुषार साळवी यांनी सांगितले होते. त्यामुळेच नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठीच ही पत्रकार परिषद घ्यावी लागली, असे उमेश शेट्ये म्हणाले.स्वत:ला शेंदूर लावून देव म्हणवून घेणाऱ्यांनी त्यांच्यात देवपण आहे का? याचा प्रथम शोध घ्यावा. गेल्या दीड वर्षापासून आमची शिवसेना पक्षात स्थानिक पातळीवर घुसमट सुरु होती. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने कळविले होते. परंतु त्यातून काही निर्णय झाला नाही. रोजरोजची घुसमट सहन करण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे म्हणूनच आपण पुन्हा राष्ट्रवादीचा रस्ता धरला, असे शेट्ये म्हणाले. (प्रतिनिधी)सेनेच्या नगरसेवकांनी कोणता विकास केला?पालिकेत शिवसेनेचे १३ नगरसेवक आहेत. त्यातील आपण वगळता १२ नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात कुठे काय व कोणती विकासकामे केली, हे जनतेला दाखवून द्यावे. या सर्व प्रभागात गटारे, रस्ते, पथदीप यांची काय स्थिती ते त्यांनी जावून बघावे. मला पराभूत करा, असे घरोघरी जाऊन सांगणाऱ्यांनी स्वत: काय विकास केला, हे प्रथम सांगावे. मी गेल्या काही वर्षात शहरात केलेली विकासकामे जनतेला माहिती आहेत आणि या निवडणुकीत तीच आमची शक्ती आहे, असे उमेश शेट्ये म्हणाले.
केतनचा आधीच राजीनामा
By admin | Updated: October 19, 2015 23:49 IST