आवाशी : सर्वत्र गाजत असलेल्या केटामाईन प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर रूतली असल्याची माहिती पुढे येत आहे. जवळजवळ वर्षभर केटामाईनची विक्री होत असल्याचा संशय असून, त्यात कंपनीचा एक अधिकारीही सहभागी असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांच्या अजूनपर्यंतच्या तपासात याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. संपूर्ण केमिकल झोन म्हणून प्रसिद्ध असणारी लोटे परशुराम औद्योगिक वसाहत गेली २५ वर्ष कार्यरत आहे. काही मोजक्या नामांकित कंपन्यांव्यतिरिक्त बहुतांशी कारखाने लघु उद्योग प्रकारातील आहेत. या लघु कारखानदारीत घेतले जाणारे उत्पादन नेमके कोणकोणत्या स्वरुपाचे असते हे अद्याप बहुतांश ग्रामस्थ व कामगारांनाही माहीत नाही. इथे असणार्या नामांकित कंपन्यांमध्ये शेतीसाठी आवश्यक फवारणी रसायने, खते, औषधे, रंग यांचे उत्पादन घेतले जाते. याव्यतिरिक्त लघु कारखानदारीमध्ये याच नामांकित वा इतर कंपन्यांचे जॉबवर्क केले जाते. मात्र, हे जॉबवर्क करत असताना संबंधित लघु उद्योजकांकडून अन्य कोणत्या उत्पादनांची आयात निर्यात होत आहे का? हे तपासणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनीचे केटामाईन हे अंमली पदार्थ संबंधित तरुणांकडून पोलिसांनी हस्तगत केले. मात्र हे प्रकरण वरवर दिसते, तसे चोरीचे नाही. त्याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. केटामाईनचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याच्या खरेदी-विक्रीला बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या कंपनीला किती उत्पादन घेण्याची परवानगी दिली आहे, ही माहिती पुढे येणे आवश्यक आहे. जर ठराविक उत्पादन घेण्याचे बंधन असेल तर चोरला गेलेला माल कंपनी व्यवस्थापन व अन्न औषध प्रशासन विभागाच्या नजरेत का आला नाही? कंपनीची सुरक्षा व्यवस्था, वरचेवर होणारी औद्योगिक सुरक्षा तपासणी कितपत सक्षम आहे? जर सुरक्षा यंत्रणा सक्षम असेल तर मागील ८ महिन्यापासून त्या पदार्थांची चोरी झालीच कशी आणि ती निदर्शनास कशी आली नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. संबंधित तरुण या प्रकरणात गुंतले गेले की त्यांना ओढले गेले अशीही चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर या पाचजणांव्यतिरिक्त कंपनीचा अधिकारी या प्रकरणात सामील असून त्याचा अद्याप कुठेही नामोल्लेख नसल्याची चर्चाही कामगारांमध्ये रंगली आहे. या प्रकरणासाठी वापरण्यात आलेली आयकॉन फोर्ड ही अलिशान गाडी लोटे येथीलच एका वैद्यकीय अधिकार्याची असून त्यांनी ती काही महिन्यापूर्वी एका आरोपीच्या नातेवाईकाला विकली होती. मात्र विक्रीची कागदपत्रे अजून केलेली नसल्याने संबंधित वैद्यकीय अधिकारी अडचणीत आला आहे. त्यामुळे याप्रकरणात आता पुढे काय होणार? याची उत्सुकता सार्यांनाच लागून राहिली आहे. (वार्ताहर)
केटामाईन प्रकरणात कंपनीचा अधिकारी?
By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST