गुहागर : काजुर्ली येथे कुंभारमळा येथे दरड कोसळल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून याप्रकरणी झालेल्या हलगर्जीपणाबाबत तहसीलदारांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.मंगळवार, २३ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काजुर्ली - कुंभारमळा येथे रस्त्याच्या वरील बाजूची दरड कोसळली. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील या रस्त्याला गटार नसल्याने दरड कोसळल्यानंतर पाण्याचा प्रवाह आणि मोठ्या दगडांमुळे समोरचा रस्ता उखडला गेला. त्यामुळे रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. घरांच्या वरच्या बाजूस मोठमोठे दगड अडकून राहिले आहेत. त्यामुळे या पाच घरांना मोठा धोका निर्माण झाला. याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी पंचायत समितीचे उपसभापती सुरेश सावंत, सदस्या गायत्री जाधव यांनी पाहणी केली. शाखा अभियंता दिलीप साळवी यांनी पाण्याचा प्रवाह पूर्ववत होण्यासाठी गटार मोकळे करणे, धोकादायक दगड हटवणे आदी कामे तातडीने करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यासाठी रविवार, २८ रोजी यंत्रसामुग्री पाठवण्याचेही कबूल केले. यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी तयारी दर्शवली. मात्र, रविवार, २८ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत बांधकाम विभागाचे कुणीही अधिकारी अथवा यंत्रसामुग्री घटनास्थळी पोहोचली नाही. यामुळे नाराज ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत आबलोली - भातगाव रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती.या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार सुहास थोरात यांच्याशी संपर्क साधून सोमवारी दुपारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि काजुर्ली ग्रामस्थ यांच्यासह पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या उपस्थित बैठक झाली.रविवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही आणि दिलेल्या वेळेत ते घटनास्थळी दुरुस्तीसाठी उपस्थितही राहिले नाहीत. याबाबत तहसीलदार सुहास थोरात यांनी त्यांची कानउघाडणी केली. अभियंता साळवी यांनी फंड नसल्याचे कारण पुढे केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी स्वतंत्र फंड आहे. तुम्ही चुकीची उत्तरे देवू नका, अशी सूचना केली. तत्काळ घटनास्थळी दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री उपलब्ध करुन ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी एम. जी. जाधव, सार्वजनिक बांधकामचे एम. बी. राऊत पी. एस. साळुंखे, ग्रामस्थ डॉ. आनंद जोशी, विजय वेळुंडे, रमेश गोणबरे, रमेश मते, विजय भुवड, सत्यवान वेलुंडे, अनंत मोहिते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
काजुर्लीतील दरडीप्रकरणी कानउघडणी
By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST