गुहागर : गुहागर नगरपंचायतीची स्थापना २०१२ला झाली असली तरी अद्याप गुहागर व असगोली ग्रामपंचायतीमधील कर्मचारी जुन्या वेतन श्रेणीवर काम करत आहेत. नगर परिषद संचालनालयातर्फे या कर्मचाऱ्यांना नगरपंचायती निकषाप्रमाणेवेतनश्रेणीसह सर्व फायदे मिळण्याबाबतची सूचना मेलद्वारे प्राप्त झाल्याने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.गुहागरचे आमदार व पालकमंत्री भास्कर जाधव हे नगरविकास राज्यमंत्री असताना २०१२मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली. गुहागर शहराच्या कमी लोकसंख्येमुळे असगोली ग्रामपंचायत यामध्ये समाविष्ट करण्यात आली. असगोली गावातून याला ठाम विरोध झाला. नगरपंचायत स्थापन होताना येथील आमदारच नगरविकास राज्यमंत्री असल्याने स्थापनेवेळी जिल्ह्यातील लांजा व देवरुख याच्यापेक्षाही अधिकचा निधी गुहागर नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आला. गुहागर हे तालुक्याचे ठिकाण व पर्यटनदृष्ट्या प्रगत शहर असल्याने नगरपंचायतीकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सुरुवातीची दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे तत्कालीन तहसीलदार जीवन कांबळे व त्यानंतर नायब तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे होती. नव्याने आलेले नगरसेवक यांना नगरपंचायत कामकाजाचा अनुभव नसल्याने कामकाज संथगतीने सुरू होते. काही महिन्यांपूर्वीच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपंचायतीची सूत्र हाती घेतल्यानंतर आता कामकाजाला गती मिळत आहे, असे असले तरी नगरपंचायतीमधील कर्मचारीवर्ग हा ग्रामपंचायत काळातील मर्यादित आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्री याबाबत कोणतीही कारणे न दाखवता दिवस-रात्र काम करताना दिसत आहेत. नगरपंचायतीला अडीच वर्षे होऊन गेल्याने या कर्मचाऱ्यांना कायम करुन नव्या निकषाप्रमाणे वेतन व सुविधा मिळाव्यात, यासाठी यापूर्वीच मागणी करण्यात आली होती.सध्या ग्रामपंचायतीपासूनचे जुने २२ कर्मचारी कार्यरत असून, नव्याने नगर परिषद संचालनालयाने दिलेल्या मंजुरीमध्ये ३१ लोकांच्या स्टाफला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आणखी नऊ कर्मचारी नव्याने भरले जाणार आहेत. यासाठी लिपिक, पंप आॅपरेटर आदी श्रेणी- ३ची पदे जिल्हाधिकारी भरतील, तर श्रेणी चारची पदे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांतर्फे भरली जाणार आहेत. याबाबतची कार्यवाही आता सुरु झाली असून, वरिष्ठ पातळीवरून आवश्यक प्रशासकीय पूर्तता झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत निकषाप्रमाणे वेतन व सुविधा मिळणार असल्याने कर्मचारीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षांनंतर न्याय...गुहागर नगरपंचायत स्थापन झाली त्यावेळी लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा मानण्यात आला होता. २०१२ साली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत हे कर्मचारी पूर्वीच्या वेतनश्रेणीवर काम करीत होते. आता नव्या आदेशानुसार त्यांना सुधारित वेतन मिळेल. नगरपरिषद संचालनालयामार्फत हे आदेश प्राप्त झाल्याचे आज सांगण्यात आले. नगरपंचायत निकषाप्रमाणे मिळणाऱ्या श्रेणी आता लागू होणार आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय
By admin | Updated: August 1, 2015 00:36 IST