रत्नागिरी : बसमध्ये चढणाऱ्या महिलेची पर्स लांबवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवल्याची घटना बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरीतील संघवीज दुकानासमोरील स्टॉप ते जिल्हा परिषद स्टॉपदरम्यान घडली आहे.
याबाबत शेफाली राजेश हळदणकर (वय ४२, रा. वांद्री भंडारवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी सायंकाळी संघवीज दुकानाच्या समोरील स्टॉपवर रत्नागिरी ते चिपळूण एस. टी. तून वांद्रीत जाण्यासाठी बसल्या. तिकिटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी आपली मोठी पर्स उघडली असता त्यांना त्यातील छोटी पर्स मिळाली नाही. त्या पर्समध्ये १४ हजार रुपयांची १३ ग्रॅमची सोन्याची चेन, ६ हजारांचे ८ ग्रॅमचे ब्रेसलेट आणि रोख ८०० रुपये असा एकूण २० हजार ८०० रुपयांचा ऐवज होता. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.