थोडा वेळ गेला तोवर दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर दारात बंडोपंत. आत येत हसून म्हणाले, म्हटलं तुमचं डोकं दुखतंय मग आपणच जावे खेकडाभजी घेऊन. मग त्यांनी गरमागरम खेकडाभजांनी भरलेला डबा सौभाग्यवतींच्या हातात देत म्हणाले, वहिनीसाहेब प्लेटा भरून आणा, आपण सर्वजण इथेच खाऊ. त्या आत गेल्या नि बंडोपंत म्हणाले, साहेब, ही डोकेदुखी अधूनमधून असते की, सारखी सारखी असते? मग त्यावर उपाय काय करता? आम्हास काही कळलं नाही. आम्ही आपले सभागती म्हणालो, काही नाही सौभाग्यवती बाम लावून डोके दाबतात. तसे बंडोपंत निळू फुले सारखे हसत म्हणाले, मग लग्नापूर्वी कोण डोके दाबायचे? तसे आम्ही नकळत बोलून गेलो. तेव्हा डोके दुखतच नव्हते राव ! असं म्हणायला आणि सौभाग्यवती भज्याच्या प्लेटा घेऊन हॉलमध्ये आल्या नि कडाडल्या, का हो आमच्या चुगल्या करता की काय? एवढी तुमची आम्ही डोकेदुखी झालो काय? तसे बंडोपंत सारवासारव करून म्हणाले, वहिनीसाहेब, त्यांचा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. तशा सौभाग्यवती जास्तच कडाडत म्हणाल्या, तुम्ही पण काय विचारता हो. म्हणे डोकेदुखी ! एवढं आम्ही काय घोडं मारलं यांचं? धुसफुसत त्या आत गेल्या. आम्ही खूप नाराज झालो. पण बंडोपंत किती हुशार. हसून म्हणाले, काय आहे साहेब. एवढं मनावर घेऊ नका. त्याचं काय आहे सांगतो. बायकोसोबत वाद घालणे म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरचे लायसन्स ॲग्रीमेंटला वाचण्यासारखे आहे. शेवटी तुम्हाला सर्व काही इग्नोर करून आय ॲग्रीवर क्लिक करावेच लागते. तशातला हा प्रकार आहे. जसं पहा आपल्याला तर काम करायचं नाही हे त्रिवार सत्य. मग सकाळी उठताना आपल्या अंगावरील ब्लॅकेट बायकोच्या अंगावर घालावी. याचे दोन फायदे होतात. एक तिला बरं वाटते आणि दोन आपल्याला घडी घालावी लागत नाही. म्हणजे आपला त्रास वाचतो. आजचीच गोष्ट सांगतो, घरी सिलिंडर जोडून दिला. तर
बायको म्हणाली, कसा जोडलाय सिलिंडर दोडान. दोनवेळा दूध उतू गेलं. कसं जगावं माणसानं. धड सिलिंडर जोडता येत नाही आणि गप्पा मारता जगाच्या. आता याला काय म्हणावं सांगा राव. दुसरं गुपीत सांगतो बायकोला तुम्ही वेळेत जेवावे याची फार चिंता आहे, असे तुम्हाला वाटतं पण तसं काही नसतं. तिला लवकर जेवून भांडी लवकर घासायची असतात. कारण सिरीयल राहाते ना बघायची. आता हे सारं मला माहीत असून काहीच माहीत नसल्यासारखं वागतो. म्हणून म्हणतो साहेब, एवढं मनावर घेऊ नका. आम्ही तर बंडोपंतांचे प्रगाढ ज्ञान ऐकून
आवाक झालो. जाऊ दे हो साहेब, एवढा विचार करून उपयोगाचा नाही. आमच्या घरीही असाच खटका झाला. म्हणून डबाभर भजी घेऊन इथं खायला आलो. तर इथंही तिच डोकेदुखी ! चला, खायला सुरुवात करा. जय डोकेदुखी !
- डॉ. गजानन पाटील