गुहागर : घरगुती वादातून जावयाने सासऱ्यावरच बंदूक रोखल्याचा प्रकार बुधवार, ८ सप्टेंबर राेजी तळवली - देऊळवाडी येथे घडली. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थ तेथे जमा झाले आणि जावयाने तेथून पोबारा केला. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात जावई श्रीकांत कातकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद चंद्रकांत शिगवण यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तळवली देऊळवाडी येथे राहणारे चंद्रकांत भागोजी शिगवण (वय ५९) हे इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांची मुलगी प्रणिता हिचा विवाह वडद येथील श्रीकांत रमेश कातकर यांच्याशी झाला आहे. कातकर हे व्यसनी असून, प्रणिता हिला मारहाण करत. याबाबत प्रणिताने आपल्या वडिलांना सांगितले हाेते. त्यानंतर प्रणिता हिला वडील चंद्रकांत शिगवण यांनी माहेरी तळवली येथे आणले हाेते. या घटनेमुळे जावई श्रीकांत कातकर यांनी रागाने सासरे चंद्रकांत शिगवण यांच्या घरी येऊन पत्नीला परत सासरी पाठवावे, असे सांगितले. त्याला विरोध केल्याने शिवीगाळ करत श्रीकांत कातकर याने सिंगल बोअर बंदुकीत एक जिवंत काडतूस टाकून चंद्रकांत शिगवण यांच्यावर राेखली. घरातील मंडळांनी हे पाहून आरडाओरड केला. त्याचवेळी ग्रामस्थ तेथे येताच श्रीकांत कातकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव करत आहेत.