लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गावातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वहाळ येथे आठवड्याचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ११ ते १७ मेदरम्यान वहाळ गावामध्ये केवळ मेडिकल, दवाखानेच सुरू राहणार आहेत. गावात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार असून, संबंधितांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय श्री वाघजाई ग्रामविकास कमिटीने घेतला आहे.
तालुक्यातील वहाळ येथे सद्य:स्थितीत ८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर गावात आजारी लोकांची संख्याही अधिक आहे. गावात एका व्यक्तीचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ विविध वस्तूंच्या खरेदीसाठी वहाळ येथे येत असल्याने गर्दी होते. त्यामुळे गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचे गावबैठकीत ठरले. त्यानुसार गावातील कोणतेही दुकान उघडणार नाही. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणी घराबाहेर पडणार नाही. घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझर वापरणे व सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक केले आहे, तसेच आठवडाभर ग्रामस्थांनी घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. गावात जिल्ह्याबाहेरील व्यक्ती कामानिमित्त अथवा वास्तव्यास आली, तर तिला कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आपल्यामुळे दुसऱ्याच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही. यासाठीची दक्षता घेण्याची सूचना ग्रामस्थांना करण्यात आली आहे.
-----------------------
खासगी डाॅक्टरांनाही सूचना
परिसरातील लोक वहाळ येथे खासगी वैद्यकीय उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यास कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे आजारी व्यक्ती खासगी डॉक्टरकडे जातात. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असताना केवळ चाचणी केली जाईल, म्हणून खासगी डॉक्टरकडे रुग्णांचा ओढा आहे. त्यामुळे गावातील खासगी डॉक्टरांनाही खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.