चिपळूण : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा दि. २४ रोजी चिपळुणात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे ज्यांचे अतोनात नुकसान झाले तसेच पूरपरिस्थितीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या नागरिकांचा २४ रोजी सकाळी ९.१५ वाजता वालोपे येथील हॉटेल रिम्स येथे सत्कार करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १० वाजता हॉटेल अभिरुची येथे खेर्डी, लोटे, गाणे-खडपोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे चर्चा करणार आहेत. तसेच चिपळुणातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून निवेदने स्वीकारणार आहेत. तर सकाळी ११ वाजता हॉटेल अतिथी येथे मराठा समाज बांधवांतर्फे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर जनआशीर्वाद यात्रा सावर्डेच्या दिशेने जाणार आहे.