रत्नागिरी : गेले अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम द्रुतगतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे दि. ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जनआंदाेलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनकर्ते महामार्गावर काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहेत.
महामार्ग गणेशोत्सवापूर्वी दि. ३० ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त व्हावा, असा आदेश उच्च न्यायालयाने ॲड. ओवेसी यांच्या याचिकेबाबत सुनावणी दरम्यान दिला होता; मात्र महामार्गाची अवस्था ‘जैसे-थे’ आहे. महामार्गाचे व महामार्गावरील पुलांची कामे द्रुतगतीने करण्यात यावे. महामार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा. महामार्गावर प्रती तीस किलोमीटर नंतर अद्ययावत प्रसाधनगृह असावे. लोकल बसथांबे महामार्गाचे बाजूला अद्ययावत पद्धतीने उभारण्यात यावेत. महामार्गाच्या दुतर्फा आराखड्यात असल्याप्रमाणे एका किलोमीटरला ५८५ झाडांची लागवड करण्यात यावी, विविध महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे काळे कपडे व काळ्या फिती बांधून महामार्गावर जनआंदोलन करण्यात येणार आहे.
जनआंदोलन महामार्गावरील शिरढोण, पोलादपूर, खेड भरणानाका, चिपळूण बहाद्दूर शेख नाका, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर-ओणी सिंधुदुर्ग येथील नांदगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कोकणवासीयांनी सहभागी होऊन महामार्ग सुकर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन समिती प्रमुख संजय यादवराव यांनी केले आहे.