गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील जेटीला पहिल्याच पावसात तडे गेल्यानंतर शहरात चर्चेचा विषय ठरला होता. लाटांच्या तडाख्यांमुळे ही जेटी टिकू शकत नाही, अशी स्थिती असताना तात्पुरती डागडुजी करुन सध्यातरी याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.गुहागर समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षण ठरावा, यासाठी वेगळ्या पद्धतीची फ्लोटिंग जेटी करण्याची संकल्पना भास्कर जाधव पालकमंत्री असताना पुढे आली. यातूनच पतन विभागामार्फत या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. जेटीचे काम चालू असताना ७ किमी असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याचे दोन भाग होऊन वेगळे वैशिष्ट्य राहणार नाही, अशा प्रकारची चर्चा सुरु होती. याचबरोबर ही जेटी रात्रंदिवस लाटांच्या तडाख्यापुढे कशी काय टिकाव धरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. जेटीला तडे गेल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी केली. यावेळी जेसीबीच्या सहायाने जेटीला संरक्षक म्हणून दोन्ही बाजूला मोठे दगड टाकण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी मोठे तडे गेले आहेत, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट भरण्यात आले आहे. जेटीवरून समुद्राकडे जाणारा मार्ग तारेने बंद करण्यात आला आहे. पावसाळी हवामानामुळे ३० सप्टेंबरपर्यंत जेटी बंद ठेवण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. सप्टेंबरनंतर जेटी पर्यटक व स्थानिकांसाठी खुली केली जाणार का? पुढील काळात काही धोका झाल्यास याला पतन विभाग जबाबदार राहणार काय, असा सवाल गुहागरवासीयांकडून केला जात आहे. या जेटीसाठी आवश्यक असणारी मेरिटाईमची परवानगीच घेतली नसल्याची माहिती माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पुढे आणली आहे. पुढील काळात जेटी उद्ध्वस्त झाल्यास किंवा जेटीमुळे कोणाच्या जीवितास हानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे. जेटीवरून समुद्राकडे जाणारा मार्ग तारेने बंद करण्यात आला आहे. या मार्गाची दुरूस्ती कधी होणार असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात जेटीला तडे
By admin | Updated: July 11, 2014 00:33 IST